Thursday, August 4, 2011

असा बालगंधर्व आता न होणे - भाग २

बालगंधर्वाच्या पहिल्या भागात आपण त्यांच्या संगीत नाटकाच्या सुरुवातीबद्दल बोललो. त्यालाच पुढे नेऊन काही नवीन गोष्टी येथे सांगत आहे.
नारायणरावांची संगीत नाटके सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय होत होती तसतसे त्यांचे चाहते हजारोंच्या संख्येत वाढत होते. त्यांची कीर्ती दूरवर पोहोचली होती.
त्या काळात आजच्या सारखी संपर्क माध्यमांची रेलचेल नव्हती तरीदेखील बालगंधर्वांचे चाहते महाराष्ट्र,गुजरात,मध्य प्रदेश,कर्नाटक आणि तामिळनाडू इथपर्यंत पसरले होते.
त्याबद्दलचा एक छोटा पुरावा म्हणून मी इथे एका गुजराथी ग्रामोफोन वरील मुखपृष्ट देत आहे.



बालगंधर्वांची नाट्यगीते प्रचंड लोकप्रिय होत होती आणि म्हणूनच ग्रामोफोनच्या कंपनीने त्याची रेकॉर्ड काढली.त्याची काही छायाचित्रे येथे देत आहे.
( लक्षात घ्या १९१० साली ह्या सर्व गोष्टी घडत आहे. त्या काळात संगीत नाटकाला एवढी प्रतिष्ठा आणणे एक चमत्कारच म्हणावे लागेल)




गंधर्व नाटक मंडळी चे अजून एक वैशिष्ट म्हणजे साथीला असणारे उस्ताद अहमद थिरकावा आणि मुल्लाजी कादरबक्ष. हे दोघे त्या काळातील सुप्रसिद्ध आणि अव्वल दर्जाचे वादक होते.संगीत नाटकामध्ये या दोघांची जुगलबंदी हे देखील एक प्रमुख आकर्षण होते.अहमद थिरकावा या मुलाचे आडनाव थिरकावा हे नव्हते. तबल्यावरील हात असा काही चाले कि ते पाहून त्यांच्या गुरूने त्यांना 'थिरकावा' हे नाव बहाल केले.( म्हणजे वीज कडाडल्यावर जशी कंपने होतात तशी त्यांच्या बोटाने तबल्यावर होत )

उस्ताद अहमद थिरकावा यांना भारत सरकारचा पद्मभूषण हा किताब देखिल मिळाला होता. म्हणजे पहा. किती महान कलावंत होता हा.
कादरबक्षांचे देखील असेच. सारंगी मध्ये त्यांचा हात धरणारा हिंदुस्थानात शोधून सापडणे अवघड. कादरबक्षांचे लवकर निधन झाले आणि त्यानंतर त्यांचा मुलगा देखील गंधर्व नाटक मंडळी मध्ये सारंगी वाजवत असे. पण नंतर त्याने पुण्यात सारंगी वादनाच्या शिकवण्या सुरु केल्याची नोंद आढळते.










बालगंधर्वांच्या नाटक मंडळीतील हि स्वर-मंजुषा बालगंधर्व रंगमादिरात आहे. आचार्य अत्रे ती यांनी खरेदी करून पुणे महानगर पालिकेस भेट म्हणून दिली.

नाटकामध्ये पहिला मखमली पडदा हा गंधर्व नाटक मंडळीच्या नाटका मध्ये आला. बालगंधर्वांनी 'द्रोपदी' नाटकसाठी १.५ लाखाचे कर्ज घेऊन मयसभा उभी केली.
( पुनश्च आठवण : या काळात सोन्याची किमत १० रुपये तोळा .
कल्पना करा १.५ लाख केवळ रंगमंचासाठी.)

मात्र हे नाटक रंगभूमीवर यशस्वी झाले नाही आणि गंधर्व कंपनी कर्जात बुडाली.सावकार पैशासाठी तगादा लाऊ लागले. रसिकांनी तेंव्हा १.५ लाखाची थैली करून दिली. पण बालगंधर्वांनी नम्रपणे नाकारून पुढे १० वर्षात ते कर्ज फेडले. स्वाभिमान म्हणा किंवा दुर्दम्य आत्मविश्वास.
हे सांगायचा उद्देश असा कि त्या काळातील सर्वोत्तम लोक हे गंधर्व नाटक मंडळी मध्ये होते आणि गंधर्व नाटक मंडळी मध्ये काम करणे हे मोठे अभिमानाचे लक्षण मानत.
हे सर्व मोठे पैसे खर्चून केवळ रसिक मायबाप डोळ्यासमोर ठेवून बालगंधर्वांनी एक संगीत पिढी घडवली.
अत्तुच्य दर्जाच्या आदर्श अश्या संगीत नाटकाचा अनुभव घेण्याचे भाग्य मराठी रसिकांना बालगंधर्वमुळे मिळाले.खरच मराठी रसिक भाग्यवान आहेत.

खरच खूप गोष्टी आहेत सांगायला पण आपली गोष्ट पुढे सरकणार नाही. तेंव्हा मी आता येथे थांबवतो आणि पुढच्या भागात नवीन घडामोडी टाकण्याचा प्रयत्न करतो.
मला इंटरनेट, पुस्तके यातून बरेच संदर्भ , फाईल मिळत आहेत. मी त्यात येथे आट्याच करत आहे.




No comments:

Post a Comment