Saturday, July 30, 2011

असा बालगंधर्व आता न होणे - भाग १
मित्रानो , बालगंधर्व सिनेमा पहिल्यापासून मला त्यांच्याबद्दल मनात कुतूहल निर्माण झाले.आपसूकच त्यांची माहिती मिळवण्यासाठी मी पुस्तके, गुगल, यु टूब,वर्तमान पत्रातील लेख, बालगंधर्वांची प्रदर्शनी मिळेल त्या ठिकाणी हजेरी लावू लागलो. पण मला इंटरनेट वर त्यांची खूप अल्प आणि अपुरी माहिती मिळाली, म्हणून स्वतःच त्यांच्याबद्दल जेवढी माहिती शक्य आहे ते लिहिण्याचा हा प्रयत्न. एखाद्या गोष्टीचे वेड लागल्यावर आपण जसे भारावून जातो तो अनुभव अश्या धकाधकीच्या जीवनात खूप दिवसांनी मिळाला.
नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा जन्म १८८८ साली पुण्यात झाला.मुळचे सांगली जिल्ह्यातील असलेले बालगंधर्व जन्माने पुणेकर होते.वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी एका मैफिलीत गायलेले गाणे लो. टिळकांनी ऐकले आणि त्यांना 'बालगंधर्व' पदवी बहाल केली. नारायण रावांनी देखील पुढील आयुष्यात ती सार्थ ठरवली आणि संगीत नाटकात एक अजरामर इतिहास घडवला.
नारायण राव आपल्या प्रेक्षाना नेहमी माय-बाप म्हणून संबोधित. बालगंधर्व नेहमी म्हणत ' माय -बाप रसिकांनो मला नेहमी 'बाल' च राहू द्या आणि माझी सतत संगीत शिकत राहायची इच्छा आहे.'
उणेपुरे ८० वयोमान लाभलेल्या या संगीत नटसम्राटाला आयुष्यात मात्र जीवनातील अत्त्युच्य शिखर आणि विदारक दुख या दोन्हीशी सामना करावा लागला.नारायणरावांचे चरित्र अतिशय रंजक आणि १०० वर्षानंतर देखील कोणालाही प्रभावित करणारे आहे.

नारायणरावांनी १९०५ साली 'किर्लोस्कर नाटक मंडळी' मध्ये प्रवेश केला. 'संगीत शांकुतल' नाटकाद्वारे त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले आणि रसिकांना अक्षरश: वेड लावले.

नाटकात नारायणराव शंकुतला स्त्री पात्र करत .नारायणराव जन्मजात सुंदर... अभिनयातील नजाकतीचे दर्शन आपल्या स्त्री पत्राद्वारे रंगभूमीवर दाखवून रसिकांच्या हृदयात अढळ असे स्थान निर्माण केले. याच्या साथीला त्यांचा गोड गळा. नाटकातील पदे म्हणताना प्रत्त्येक शब्द हा अगदी साखरेच्या पाकात घोळून यावा तसा त्यांच्या गळ्यातून येत असे.संगीत नाटक आणि किर्लोस्कर नाटक मंडळी दोन्ही गोष्टींचा भरभराट होत होता. याला कारण नारायणरावांचे गाणे आणि अभिनय.पण पुढे नारायण रावांचा खर्च अवाजवी होऊ लागला आणि त्यात वाद होऊन नारायणराव , गोविंदपंत टेंबे व गणेश बोडस यांनी नाटक कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.१९१३ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत ढमढेरे बोळात 'गंधर्व नाटक मंडळी' ची स्थापना झाली.

१९०६ ते १९३३ हा बालगंधर्वांचा आणि संगीत नाटकाचा सुवर्णकाळ ठरला।नारायणरावांची स्त्री पात्रे भलतीच लोकप्रिय होऊ लागली. सुभद्रा, शंकुतला,भामिनी, शारदा अशी भव्यदिव्य पात्रे तर 'एकाच प्याला' मधील जीर्ण साडीमधील सिंधू पाहून रसिक थक्क झाले. त्या काळात बालगंधर्व म्हणजे एक ' स्टाइल आयकोन ' बनले होते. बालगंधर्वांच्या भरजरी साड्या,नक्षीदार दागिने याची स्त्रीयांना भुरळ पडली नसती तर नवल.अगदी साबण,सौंदर्य प्रसाधने यावर देखील बालगंधर्वाचे चित्र असायचे.बालगंधर्वांचे नाटक पाहणे म्हणजे एक स्वर्ग अनुभव असे.
त्याला कारणही तसे असे.रंगमंचावर प्रकाश आणि रंगांची इतकी विलक्षण उधळण असे कि रसिक मायबापांचे डोळे दिपून जात असे. ज्या काळात सोने १० रुपये तोळा या भावात मिळत होते त्या काळात ७५ हजारांचे रंगमंच उभारून संगीत नाटक आणि रसिक मायबाप यांच्यावरील नारायणरावांच्या प्रेमाची जाणीव होते.
नाटकाला येणाऱ्या रसिकवर उंची अत्तरांचा फवारा.रंगमंचावर सुंदर मखमली पडदे, मुलायम गालिचे,सिंहासन ,प्रकाशाचा लखलखाट. प्रत्तेक पात्राची वस्त्रे मखमली कापडाची. सोन्याच्या मुलामा दिलेले दागिने, मुकुट.मंत्रमुग्ध होऊन जावे असा आवाज. तबला आणि सारंगीची अप्रतिम साथ.
बालगंधर्वांनी 'अमजदखान थिरकांवा' यांना खास बोलावून जास्त मानधन देऊन नाटक कंपनी मध्ये ठेवले. सारंगी वर 'कादरबक्ष' असत. नाटकात हे दोघे असा काही जल्लोष उडवून देत कि बस.याच बरोबर हार्मोनियम वर हरिभाऊ देशपांडे असत.गंधर्व नाटक मंडळीचे नाटक मात्र नेहमी उशिरा सुरु होत आणि पहाटे उशिरापर्यंत चालत. बालगंधर्व स्वतःची रंगभूषा आणि वेशभूषा स्वतः करत.ते अगदी 2 - 4 तास चालत असे।
पडदा उघडण्या आधी 'नांदी' चे सूर कानावर पडत असत.' कालिदास कविराज रचित हे , गानी शाकुंतल रचितो......'आणि मग नाटकामधील अवीट गोडीची पदे.स्वयंवर नाटक जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा बालगंधर्व सलग ६-६ वेळा वन्स-मोर घेत. साहजिकच नाटक पहाटे ४.३० च्या आसपास संपत असे।

नाटक संपल्यावर सर्व रसिकांना पहाटे घुंगुर मास आणि गरम खिचडीचे जेवण मिळत असे।
(काय मंतरलेले दिवस होते ना ते. मला तर नुसत्या कल्पनेने शहारून जाते.पूर्वी पुण्यात दगडूशेठ ला संगीत महोत्सवाचे कार्यक्रम चालत कोतवाल चावडी ते समाधानच्या चौकात असत त्याची आठवण होते. आता नवीन नियमामुळे १० ला कार्यक्रम बंद करावा लागतो।)

हे झाले नाटकाचे. पण नाटकातील कलाकारांची देखील खास देखभाल असे. गंधर्व नाटक कंपनीत साधारण १५० लोक होते. रोज १५० लोकांची पंगत असे. चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नाचे जेवण असे.तसेच नाटकाचे कपडे धुण्यासाठी परीट,न्हावी असे सर्व वेगळे. नारायण रावांचे स्वता:चे परीट,न्हावी खास वेगळे होते.नाटकाचे सामान एवढे होते कि नुसते ते दौराच्या ठिकाणी हलवायला रेल्वे च्या ६ बोगी लागत होत्या।

साहजिकच एवढा सगळा लवाजम चालवायचा म्हणजे पैसे खर्च वाढला. त्यात नारायणरावांचा अवाजवी खर्च देखील नियंत्रणाबाहेर गेला.केवळ गालिच्यासाठी १६ सहस्त्र रुपये खर्ची पाडत. अर्थात नाटक कंपनी आणि बालगंधर्व यांच्यावर प्रेम करणारी माणसे होती आणि त्यामुळे या सर्व गोष्टी निभावून जात होत्या.पण गंधर्व नाटक मंडळी वर कर्ज वाढत होते।
बालगंधर्वांच्या गाण्यावर फिदा असणारे अनेक धनिक रसिक चाहते होते. त्यातील एक म्हणजे शेठ लक्ष्मिचंद थेट कराची मधून.

पुण्यातील पेरूची बाग म्हणजेच सध्याचे पुणे आकाशवाणी केंद्र. अनेक दिवस नारायण राव या जागेचे मालक होते हे अनेक जणाना ऐकून आश्चर्य वाटेल.

नारायणराव आणि केशवराव भोसले यांनी मिळून एक संयुक्त मानापमान चा प्रयोग केला आणि त्याचे प्रवेशिका दर होते १०० रुपये. तरीदेखील सर्व प्रवेशिका संपल्या.यावरून बालगंधर्व किती लोकप्रिय होते याची प्रचीती येते.साधारण १९३१ च्या आसपास पहिला बोलपट आला आणि तिथून पुढे संगीत नाटकाला उतरती कळा लागली.
-----------
क्रमश:

8 comments:

 1. प्रयत्न आवडलाय......चालु ठेवा ...

  ReplyDelete
 2. देशमुख साहेब! नमस्कार ..
  पहिलाच लेख अत्यंत बहारदार आहे. भाषेवरची आपली पकड पहाता, बाकी विषयांवर पण आपण लिहावेत असे वाटते. आपली प्रवास वर्णनंही येऊद्यात. ही सुरुवात आहे, अजून येऊद्यात !!!
  पुढील लेखनास मन:पुर्वक शुभेच्छा...

  ReplyDelete
 3. Simply Great. Since you have mentioned "Keshavrao Bhosale"s name in the blog I would like to share with you that there is a theatre after his name in Kolhapur called "Keshavrao Bhosale Natyagruha".

  Keep blogging.

  ReplyDelete
 4. छान लिहिलं आहेस ... एखाद्या व्यक्तीचा राहणीमान , रुबाब्दारपणा आणि काळाचा वर्णन शब्दांमध्ये मांडणे फार अवघड असते .. तुझ्या लेखातून थोडावेळ त्या काळात गेल्याच भासलं .. ह्यातच लेखाची परिपूर्णता सिद्ध होते ... लिहित राहा :) - चैत्राली

  ReplyDelete
 5. मित्रा,
  आरंभ उत्तम. मुंगीच्या चिकाटीने वाटचाल अखंड राहू दे अशीच शुभेच्छा !
  - श्रीकृष्ण जोशी

  ReplyDelete
 6. लेख उत्त्तम आहे. एक पुणेकर म्हणुन ही माहीती असणे गरजेचे आहे.

  Keep it up :)

  ReplyDelete