Friday, September 2, 2011

असा बालगंधर्व आता न होणे - भाग 3


बालगंधर्व... मनस्वी कलावंत, प्रामाणिक करदाताही!

वैभव वझे : सकाळ वृत्तसेवा

मुंबईपद्मभूषण नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारचा प्राप्तिकर आणि करमणूक कर कधीही चुकवला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. 1 जून 1921 ते 1928 अखेर या 80 महिन्यांच्या आर्थिक नोंदींच्या एकत्रित नोंदीत बालगंधर्वांनी या काळात 12 हजार 648 रुपये 8 आणे प्राप्तिकर आणि 38 हजार 548 रुपये करमणूक करापोटी सरकारकडे भरले होते. 

बालगंधर्वांचे सख्खे बंधू आणि गंधर्व नाटक मंडळीचे व्यवस्थापक बापू उर्फ व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांच्या 1935 मधील रोजनिशीतील वरील नोंदी आहेत. वरील 80 महिन्यांत गंधर्व नाटक मंडळीला एकूण 11 लाख 1 हजार 326 रुपये 13 आणे उत्पन्न झाले होते. याच काळातील कर, भाडे, मानधन असा एकूण खर्च 8 लाख 59 हजार 800 रुपये 14 आणे झाला होता. त्यानंतर 1928 ते मे 1931 पर्यंतच्या 40 महिन्यांत गंधर्व नाटक मंडळीने सरकारकडे 10 हजार 239 रुपये प्राप्तिकर भरला होता. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांच्या कन्या आणि बालगंधर्वांच्या पुतणी नीलांबरी ऊर्फ नीलांबरी ज्ञानेश्वर बोरकर म्हणाल्या, माझे वडील गंधर्वा नाटक मंडळीत व्यवस्थापक होते. कंपनीचा रोजचा खर्च तेच पाहायचे. तसेच बारीकसारीक नोंदी लिहून ठेवायचे. बालगंधर्वांचा स्वभाव दिलदार असल्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याची जबाबदारी बापूंवर असायची. 1935 नंतर गोहरबाई कर्नाटकी यांनी बापूंना व्यवस्थापक पदावरून दूर केले. पुढे बापू मळवली येथे स्थायिक झाले. 

बालगंधर्व यांच्यावरील चित्रपटाने वातावरण गंधर्वमय झाले असतानाच बालगंधर्वांच्या स्वभावाचे अनेक पैलू समोर येत आहेत. बालगंधर्वांच्या सचोटी आणि प्रामाणिकपणाचे गोडवे आजही गायले जातात. बालगंधर्व हे प्रामाणिक करदाते होते, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. 
प्राप्तिकर विभाग दरवर्षी प्रामाणिक करदात्यांची यादी प्रसिद्ध करतो. त्यामध्ये कलावंतांची, खेळाडूंची तसेच औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली जातात; परंतु याच क्षेत्रांतील अनेक लोक प्राप्तिकराचा भरणा प्रामाणिकपणे करत नाहीत हे उघड झाले आहे. स्वतःची कंपनी आर्थिक अडचणीत असताना, तिची सतत फिरती सुरू असताना, कंपनीतील प्रत्येकाला सुग्रास भोजन, प्रत्येकाच्या कुटुंबीयांना सणासुदीला आहेर, नाटकासाठी केला जाणारा वारेमाप खर्च असे अनेक खर्च करतानाच बालगंधर्वांनी कधीही प्राप्तिकर चुकवला नाही, याची नोंद प्रत्येक कलावंताने घ्यायला हवी.
व्यंकटेश उर्फ बापू राजहंस यांच्या रोजनिशीतील मजकूर

गंधर्व नाटक मंडळी
तपशील 1 जून 1921 ते 1928 अखेर 
रुपये.आणे.पैसे
भोजन खर्च 165820.15.6
थिएटर भाडे 156210.14.6
पगार कपडे 146870.14.3
प्रवास खर्च, गाडीभाडे 28484.7.9
घरभाडे 25298.9.3
छपाई जाहिरात 33492.8.6
ड्रेस, धुलाई, सीनसिनरी 85513.14.6
स्टेशनरी, औषधे 23391.13.6
धर्मादाय देणग्या 25445.8.9
इन्कमट्यॅक् 12648.8.0
करमणुकीचा कर 38548.0.0
कोर्ट खर्च 9660.0.0
नाटककर्त्यास दिले 15234.0.0
कमिशन 3540.7.3
व्याज 1481.6.0
विमा 15159.4.0
धर्मार्थ खेळ 0.0.0
इलेक्ट्रिक खर्च 0.0.0
थिएटर खर्च 0.0.0
किरकोळ 0.0.0
श्री. नारायणराव 63080.4.0
घरखर्च 0.0.0
----------------------------
एकूण खर्च 859800.14.3
---------------------------
एकूण उत्पन्न 1101326.13.0